मुंबई – अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ओह माय गॉड 2’ लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अक्षयने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत याबाबतची माहिती चाहत्यांना दिली. यावेळी अक्षयने ओह माय गॉडमधील आपला नवा लूक देखील प्रेक्षकांसमोर आणला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमही मुख्य भूमिकेत आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये अक्षय कुमारचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचे अक्षयने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षयने भगवान श्री कृष्णची भूमिका साकारली होती आता दुसऱ्या भागात अक्षय भगवान शंकरांच्या भूमिकेत दिसणार आहे.
ओह माय गॉड 2 याबाबतची माहिती देताना अक्षय कुमारने लिहिले, आम्ही येतोय.. तुम्हीही या 11 ऑगस्टला सिनेमागृहात. यावेळी शेअर केलेल्या फोटोमध्ये अक्षय भगवान शिव शंकरांच्या रूपात दिसत आहे.अश्विन वर्दे, वायकॉम 18 आणि जिओ स्टुडिओज चित्रपटाची निर्मित केली असून अमित राय यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट अंध भक्तांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला होता.जेव्हापासून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली तेव्हापासून याची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर अक्षयने याबाबतचा सस्पेन्स संपवून चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. आता या चित्रपटात नेमकं कोणत्या गोष्टीवर भाष्य केलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.