पुणे – जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि आडत्यांवर दाखल ऍट्रॉसिटीसह विनयभंगाच्या गुन्ह्यात सर्वांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. फिर्यादी महिलेने आजारपणाच्या कारणामुळे म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने आणि गुन्ह्यातील शिक्षा सात वर्षाखालील असल्यामुळे 28 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व मंजुर झाला आहे. विशेष न्यायाधीश जी.ए.रामटेके यांनी हा आदेश दिला आहे. 28 एप्रिललाच बाजार समितीसाठी मतदान होणार आहे.
याबाबत एका लिंबू विक्रेत्या महिलेने मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मधुकांत गरड हा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये सर्वांनी ऍड. सुनील कदम, ऍड. सुधीर शहा, ऍड. खंडेराव टाचले आणि ऍड. मनिष मगर यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. गेल्या वर्षी मार्केट यार्डच्या आवारातील बेकायदा फळ विक्रेते तसेच लिंबू विक्रेत्यांच्या विरुद्ध कारवाई केली.
फळबाजारात बेकायदा व्यवसाय करणाऱ्या लिंबू विक्रेत्यांनी कारवाईच्या निषेधार्थ मार्केट यार्डच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह 20 ते 25 जणांनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच अश्लील शिवीगाळ केल्याची फिर्याद लिंबू विक्रेत्या महिलेने पोलिस स्टेशनला दिली आहे. वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.