गावात पाणी टंचाईचे संकट गहिरे; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती, संभाजीनगरमधील भीषण वास्तव समोर

राज्यभरात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. अशातच दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हाच्या तीव्रतेत संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात हंडाभर गावकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. पाण्यासाठी ४३ अंशावरच्या रखरखत्या उन्हात ३०० फूट दरीत उतरून पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
मी महिन्याच्या सुरवाती पासूनच सर्वाधिक पाणी टँकर मराठवाड्यांच्या रस्त्यावर दिसतायत.असे असले तरी अशी अनेक गावे आहे, जिथे ना टँकर आहे ना गावकरांना नळाचा आधार आहे. अशा गावातील गावकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी खोलदरीमध्ये उतरावे लागत आहे; अनेक किलोमीटर वणवण भटकंती करावी लागत. असेच काहीसे चित्र संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सध्या पाहण्यास मिळत आहे.
सोयगाव तालुक्यात सावरखेडा पांढरी गावातील गावकऱ्यांना तसेच विशेष म्हणजे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी ३०० फुट खोल डोंगरात उतरून डोंगरातून येणाऱ्या झऱ्याचे पाणी आणावे लागते. या गावात टँकरची सुविधा नसल्यामुळे गावकरांना हंडाभर पाण्यासाठी दोन- दोन तास उन्हात वाट काढून डोक्यावर घागरी घेऊन डोंगर चढून घरी यावे लागते.





