“कडकनाथ’ प्रकरण: सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
सोलापूर: महारयत ऍग्रो इंडिया इस्लामपूर या नावाने कंपनी स्थापन करून कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी करार करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीचे संस्थापक सुधीर शंकर मोहिते यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने करण्यात आली.
तसेच त्यांना पाठीशी घालणारे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोलापुरातील बाळे परिसरातील फसवणूक झालेला तरुण शेतकरी रवी गावडे यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते.
महारयत कंपनीच्या अमिषाला बळी पडून सोलापूरसह ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रोजगार उपलब्ध होईल या आशेने कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी करार केला. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी सुमारे 500 कोटींवर, तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व तरुणांनी 10 कोटीच्या आसपास रक्कम गुंतवली. मात्र, त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी थेट पोलिसात धाव घेतल्यानंतर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.