मुंबई – अभिनेता रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते, त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी रणवीर त्याच्या कायदेशीर टीमसह आज सकाळी साडेसात वाजता मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात आपले म्हणणे नोंदवण्यासाठी पोहोचला. रणवीरला मुंबई पोलिसांकडून नोटीस देण्यात आली होती, ज्याअंतर्गत त्याला पोलिसांसमोर हजर राहावे लागणार होते.
मिळालेल्या माहितीनुसार आयपीसीच्या कलम 292, 294, 509 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 ए अंतर्गत रणवीर विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.मुंबई पोलिसांनी जवळपास दोन तास रणवीर सिंगचा जबाब नोंदवला. पोलिसांनी रणवीरला 30 ऑगस्टला म्हणजेच उद्या हजर होण्यासाठी समन्स बजावले होते, मात्र रणवीर सिंगने आज पोलीस स्टेशन गाठून त्याचा जबाब नोंदवला असल्याचे समोर आले आहे.
चौकशीदरम्यान पोलिसांनी रणवीरला अनेक प्रश्न विचारले जसे की, न्यूड फोटोशूटसाठी कोणत्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट होते, फोटोशूट केव्हा आणि कुठे केले, अशा शूटमुळे लोकांच्या भावना दुखावू शकतात, तुम्हाला याबद्दल माहिती आहे का? मिळालेल्या माहितीनुसार, या प्रश्नांची उत्तरे देताना रणवीर सिंगने आपण निर्दोष असल्याचे म्हंटले आहे. .
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी यापूर्वी 22 ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले होते, मात्र परदेशात असल्याचे कारण देत रणवीर सिंगने मुंबई पोलिसांकडे हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता. रणवीरच्या या विनंतीनंतर पोलिसांनी त्याला पुन्हा समन्स पाठवले आणि 30 ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले.
रणवीर सिंहने ‘पेपर’ मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले होते. या फोटोशूटचे फोटो रणवीरने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटोशूट 1972 मध्ये ब्रूट रेनॉल्ड्सच्या आयकॉनिक फोटोशूटला श्रद्धांजली म्हणून पहिले गेले होते. ब्रुटचे फोटोशूट कॉस्मोपॉलिटन मासिकात प्रसिद्ध झाले होते.