आता अमेरिकेत हिंसाचार; १७ शहरातून १४०० जणांना अटक

न्यूयॉर्क : अमेरिकेत सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातच  आता अमेरिकेसमोर नवे संकट उभे राहिले आहे. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सुरु असलेला हिंसाचार अद्यापी थांबलेला नाही. उलट अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे. जॉर्ज फ्लॉयड या आफ्रिकन वंशाच्या नागरिकाचा सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलने सुरु आहेत. इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.

आंदोलना प्रकरणी आतापर्यंत अमेरिकेतील १७ शहरातून १४०० जणांना अटक करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मिनियापोलिस शहरातील पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण त्याने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. काही ठिकाणी शांततेत आंदोलन सुरु आहे तर काही ठिकाणी हिंसक पद्धतीने विरोध सुरु आहे.

अटक करण्यात आलेल्या आंदोलकांची संख्या १४०० पेक्षा सुद्धा जास्त असू शकते. कारण शनिवारी रात्री सुद्धा अमेरिकेत आंदोलने झाली. पोलीस कोठडीत घडलेली घटना खूप भयानक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. फ्लॉयड यांच्या ‘कुटुंबीयांशी मी बोललो असून ती खूप चांगली माणसं आहेत’ असे ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले होते. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूमुळे अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर होणारा अत्याचार, अन्यायाचा मुद्दा समोर आला आहे. त्याला वांशिक भेदभावाची किनार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.