पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रथमच “स्लिपर’ बस बनविण्याच्या निर्णय घेतला आहे. दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळा येथे 50 स्लिपर बस बनविण्यात येणार आहेत. या वर्षात ह्या स्लीपर बस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असा विश्वास एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी व्यक्त केला.
एसीट महामंडळाने वेळोवेळी प्रवाशांच्या सेवेत नवनवीन बसचा समावेश केला आहे. सुरूवातीला पिवळे धत असलेल्या बसपासूनचा प्रवास आता “शिवाई’ ई-बस पर्यंत येऊन ठेपला आहे. पण, अजूनही प्रवाशांच्या मागणीनुसार विविध बस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून केला जात असल्याचे दिसून येते. अलिकडे रात्रीच्या वेळी लांब पल्ल्यांचा प्रवास करताना नागरिकांकडून स्लीपर बसला प्राधान्य दिले जात आहे.
त्यामुळे अनेक खासगी स्लीपर बसला गर्दी असते. नेमके हेच लक्षात घेऊन एसटीने देखील त्यांच्या ताफ्यात पूर्ण स्लीपर बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात स्लिपर व सिटींग अशी दोन्ही सोय असलेल्या काही बस आहेत. पण, आता नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या बस या पूर्णपणे स्लीपर असणार आहेत. त्या प्रमुख्याने रात्रीच्यावेळी लांब पल्ल्यांच्य मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
याबाबत चन्ने यांनी सांगितले, की पुण्यातून मराठवाडा, विदर्भात प्रवास करणाऱ्यांकडून स्लीपर बसची मागणी होती. त्यामुळे एसटीने देखील त्यांच्या ताफ्यात स्लीपर बसचा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षात 50 स्लीपर बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ही बस बारा मीटरची असून त्यामध्ये प्रवाशांची क्षमता 30 राहणार आहेत. या बस नॉन एसटी असल्या तरी प्रवाशांच्या दृष्टीकोनातून इतर सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. या सर्व बसची बांधणी दापोडी येथील मध्यवर्ती कार्यालयात केली जाणार आहे.