नगर – नगर शहर शिवसेनेत फूट पडलेली असताना भिंगारमध्येही शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे भिंगार शहरप्रमुख सुनील लालबोंद्रे यांच्यासह छावणी मंडळाचे माजी उपाध्यक्ष प्रकाश फुलारी, सदस्य संजय छजलानी आणि रवींद्र लालबोंद्रे, प्रशांत डावरे यांच्यासह एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाला आहे.
यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी नगरसेवक सचिन जाधव, काका शेळके, उपशहरप्रमुख शशांक महाले, अनिकेत कराळे, उद्योजक रमाकांत गाडे आदी उपस्थित होते. दिलीप सातपुते व अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे भिंगार शहरप्रमुख सुनील लालबोंद्रे यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी गुरूवारी (दि.28) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. भिंगार छावणी मंडळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस असे मिळून सात नगरसेवक होते. त्यापैकी तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने भिंगार शहरात शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.
आजी-माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे नगर शहरातील शिंदे गटाला बळ मिळाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक आजी-माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच व सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा नगर शहरातील शिंदे गटाकडून केला जात आहे.
————–