पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यापासून कारागृहात गेलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मुंबईनंतर कोल्हापुरात अटकेत असलेले सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी आता पुणे पोलिसांचं पथक कोल्हापूरला रवाना झालं आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये छत्रपती घराण्याचे वंशज छत्रपती संभाजी राजे आणि सकल मराठा समाजाविरोधात अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदावर्ते यांची कोल्हापुरातील पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर कऱण्यात येणार आहे. आता पुणे पोलिस त्यांचा ताबा घेणार का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
कात्रज परिसरात राहणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अमर रामचंद्र पवार (वय 35 वर्षे) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिली होती. सदावर्ते यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली होती. शिवाय जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही सदावर्ते यांच्यावर करण्यात आलेला आहे.