म्हैसूरपाक खाल्ल्याने तीन दिवसांत कोरोना बरा होत असल्याचा दावा पडला महागात

वाचा काय आहे प्रकरण...

कोयंबतूर – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस वा औषध उपचार पद्धती अद्याप सापडली नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र नागरिकांमधील याच भीतीचा गैरफायदा काही लोक घेऊ पाहत आहेत. असंच एक प्रकरण तामिळ नाडुतील कोयंबतूर येथे उघडकीस आलं आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील एका स्थानिक मिठाई दुकानदाराने आपल्या दुकानातील म्हैसूरपाक ही मिठाई खाल्ल्याने कोरोनापासून ३ दिवसांमध्ये सुटका होते असा दावा केला होता. एवढंच नव्हे तर त्याने याबाबतची प्रसिद्धी पत्रकं देखील छापली होती.

याद्वारे त्याने आपल्या दुकानातील १९ औषधी वनस्पतींपासून बनवलेला म्हैसूरपाक खाल्ल्यास ३ दिवसात कोरोना मुक्ती होते असं म्हंटलं होतं. या मिठाईची किंमत त्याने प्रतिकिलो ८०० रुपये इतकी ठेवली होती. काही लोकांनी या मिठाईची खरेदी देखील केली होती.

मात्र हा सर्व प्रकार अन्न सुरक्षा विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ हे दुकान सील करत सदर कोरोना म्हैसूरपाक जप्त केला. जप्त करण्यात आलेला म्हैसूरपाक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून तेथे त्याची चाचण्या करण्यात येतील. संबंधित मिठाई दुकानदाराविरोधात देखील योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.