नवी दिल्ली – तेलंगणा विधानसभेसाठी होणाऱ्या मतदानाला आता काहीच तास शिल्लक राहीले आहे. उद्या येथील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र तत्पूर्वीच या राज्याने एका विक्रमाची नोंद केली आहे. ती म्हणजे येथे पुरूष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. याचा अर्थ मतदात्यांच विचार करता महिला दाते अधिक आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार तेलंगणातील एकूण मतदार संख्या ३,२६,१८,२०५ आहे. यात पुरूष मतदारांची संख्या १,६२,९८,४१८ आहे. तर महिलांची संख्या १,६३,०१,७०५ आहे.
आता महिला मतदारांची चर्चा होत असताना इतिहासात महिलांसाठी आजचा दिवस म्हणजे २८ नोव्हेंबर अगदी खास आहे. त्याचे कारण म्हणजे १८९३ या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबरला न्यूझिलंडमध्ये महिलांनी पहिल्यांदा मतदान केले होते.
वुमन्स ख्रिश्चन टेम्परन्स युनियन अर्थात डब्लूसीटीयूच्या नेतृत्वाखाली महिलांनी १३ वर्षे मतदानाचा हक्क मिळण्यासाठी आंदोलन केले होते व त्यानंतर त्यांना हा हक्क बहाल करण्यात आला होता. डब्लूसीटीयूच्या केट शेपर्थ यांनी महिलांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी ८२ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी शेपर्थ यांनी ३२ हजार महिलांकडून संबंधित याचिकेवर स्वाक्षरी करवली होती.
यामुळेही आहे महत्व –
महिलांच्या दृष्टीने २८ नोव्हेंबर हा दिवस आणखी एका कारणासाठी महत्वाचा आहे. २८ नोव्हेंबर १९९६ या दिवशी भारतीय वंशाच्या महिला इंद्राणी सिंह यांनी एअरबस ए-३०० चे उड्डाण करून इतिहास रचला होता. असा पराक्रम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
आजच्याच दिवशी १९९० साली ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांनी ब्रिटनच्या महाराणीकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला होता. इतिहासात आयर्न लेडी म्हणून प्रसिध्द असलेल्या थॅचर यांनी ११ वर्षे ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती.