लंडन – सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच याला यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत करोना लस न घेताही सहभागी होता येणार आहे. करोना लस न घेतल्यामुळे जोकोवीचला यंदाच्या मोसमातील ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत खेळता आले नव्हते. मात्र, ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यासाठी लसीकरण सक्तीचा नियम रद्द करण्यात आल्याने आता जोकोवीचचा विम्बल्डनमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विम्बल्डनमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना लस घेण्याचे आवाहन केले असले तरीही बंधनकारक करण्यात आलेले नाही, असे ऑल इंग्लंड क्लबने जाहीर केले आहे. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेला येत्या 27 जूनपासून सुरुवात होणार आहे.
विक्रमी विजेतेपदाची संधी
जोकोवीचला ऑस्ट्रेलियन स्पर्धेप्रमाणेच अमेरिकेत झालेल्या इंडियन वेल्स आणि मियामी खुल्या स्पर्धेलाही मुकावे लागले होते. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत परदेशी नागरिकांना लसीकरणाची सक्ती करण्यात आली होती. मात्र, दोन वेळा करोनाची बाधा झालेल्या जोकोवीचने लस घेण्यास नकार दिला होता. आता 20 ग्रॅंडस्लॅम विजेत्या जोकोवीचला विम्बल्डनचे विजेतेपद मिळवण्याची संधी मिळाली आहे.