नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री राम विलास पास्वान यांच्या निवासासाठी देण्यात आलेले 12 जनपथ हे निवासस्थान खाली करण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने लोकसभेचे खासदार आणि लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पास्वान यांच्यासह 12 जणांना नोटीस बजावली आहे.
या नोटीशीबद्दल चिराग पास्वान यांनी ताताडीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. लोकजनशक्ती पक्षाच्या बैठका आणि अन्य कार्यक्रमही याच निवासस्थानावर होत असत.
हा बंगला केंद्रीय मंत्र्यासाठी राखीव आहे. त्यामुळे तो ताब्यात ठेवणाऱ्यांना तो खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे, असे या खात्यातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
रामविलास पास्वान या बंगल्यात गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये निधन होईपर्यंत सुमारे 30 वर्ष रहात असत. सध्या त्यांची पत्नी, मुलगा चिराग आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचे तेथे वास्तव्य आहे.