पुणे – किरण गोसावीच्या शोधार्थ पुणे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील लखनौ येथे धडकले होते. मात्र काही मिनिटांच्या फरकाने किरण गोसावीने तेथून पळ काढला. पुणे पोलिसांच्या हाती गोसावी लागता लागता वाचला. दरम्यान गोसावीने लखनौवरुन फत्तेपुर गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान किरण गोसावीने सोमवारी पोलिसांना शरण येण्याचे एका वृत्त वाहिणीशी बोलताना जाहिर केले होते. मात्र ही शरणागती महाराष्ट्र पोलिसांपुढे करणार नसून उत्तर प्रदेश पोलिसांसमोर केली जाईल असे जाहिर केले होते.
पोलीस दलातील सूत्रांनूसार, एनसीबीने कारवाई केल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली. यानंतर क्रुझवरची छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल झाले. यामध्ये आर्यनसोबत एका व्यक्तीने काढलेला सेल्फी मोठा चर्चेत आला. या व्यक्तीसंदर्भात एनसीबीने खुलासा केला होती की तो आमचा अधिकारी नाही.
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दोन व्यक्तींची नावे घेतली. यातील एक व्यक्ती के पी गोसावी असल्याचे उघड झाले. या गोसावीवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये एक फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. गोसावीवर 29/5/2018 रोजी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी चिन्मय श्रीधर देशमुख (22, रा.कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली होती. त्याने दिलेल्या फिर्यादीनूसार गोसावी याने फेसबुकवरील हॉटेल मॅनेजमेंट जॉब्स ग्रुपवर हॉटेल मॅनेजमेंटच्या जागा असल्याची जाहिरात केली होती. फिर्यादीने जाहिरात वाचून संपर्क केला असता, त्याने ई मेल आयडीवर बायोडाटा पाठवण्यास सांगितले. यानंतर मेलशिया येथे नोकरी असल्याचे सांगत एका बॅंक अकाऊंटवर 309313 रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केली होती. गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करेपर्यंत गोसावी पोलिसांच्या हाती नव्हता. त्याला फरार घोषीत करण्यात आले होते. सध्या गोसावीच्या शोधार्थ लुक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे.
पुणे पोलिसांची दोन पथके उत्तर प्रदेशात गोसावीच्या शोधार्थ आहेत. यातील एक पथकाच्या हाती तो लागता लागता वाचला. मात्र पोलिसांची पथके त्याचा माग काढून त्याला नक्कीच जेरबंद करतील अशी माहिती एका अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.