महिला बचतगटांना एक लाखापर्यंत कर्ज – नरेंद्र मोदी

औरंगाबाद- बचतगटाच्या प्रत्येक महिलेला स्वतःचा रोजगार सुरु करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मुद्रा योजने अंतर्गत एक लाखापर्यंत कर्ज देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. इतकंच नाही तर जनधन खातं असलेल्या महिलांना खात्यात पैसे नसले तरीही 5 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
औरंगाबादमध्ये ऑरिक सिटीचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांनी ही घोषणा केली. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी मराठीत केली. इतकंच नाही तर ऑरिक सिटीच्या माध्यमातून अनेक कंपन्या औरंगाबादमध्ये येतील. यामुळे मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

नरेंद्र मोदी म्हणाले, क्रांतीवीर उमाजी नाईक यांची आज जयंती आहे. तसेच आज महालक्ष्मी विसर्जनाचा दिवस आहे. तरीही महिलांनी मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
पाणी आणि शौचालय या महिलांच्या दोन प्रमुख समस्या असल्याचे ज्येष्ठ नेते राममनोहर लोहिया यांनी 70 दशकात संसदेत सांगितले होते. या समस्या सोडवल्या तर महिलांचाही देशाच्या विकासात हातभार लागेल, असेही लोहिया म्हणाले होते. लोहिया गेले, त्यानंतर अनेक सरकारंही आली आणि गेली. मात्र महिलांच्या या दोन समस्या सुटल्या नाहीत. मात्र आमचं सरकार ही समस्या सोडवण्यासाटी कटिबद्ध आहे, असेही मोदींनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.