पीकविमा नव्हे प्रधानमंत्री कॉर्पोरेट योजना; राजू शेट्टी यांची सरकारवर टीका

विमा कंपन्यांचा सरकारी तिजोरीवर दरोडा

संगमनेर: राज्य मागील दोन वर्षांपासून दुष्काळाने होरपळत आहे. पीकविमा कंपन्या दिवाळखोरीत निघायला हव्या होत्या. मात्र 20 हजार कोटींचा नफा त्यांनी कमविला आहे. त्यांनी कमविलेला नफा म्हणजे सरकारच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा असून, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक आहे. सरकारने यावर काही केले नसून, हा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे मला वाटते प्रधानमंत्री फसल योजना नसून, ती प्रधानमंत्री कॉर्पोरेट योजना आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

नाशिक जिल्ह्यातील आपला दौरा उरकून ते संगमनेर मार्गे पुणे येथे शनिवारी (15 जून) दुपारी जात असताना कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव संगमनेर शासकीय विश्रामग्रह येथे थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वाभिमानी शेतकरी संघटनचे दशरथ सावंत, संतोष रोहम, दीपक वाळे, भास्कर दिघे, आनंद वाकचौरे, भाऊसाहेब हांडे, रईस पठाण आदी उपस्थित होते.

शेट्टी पुढे म्हणाले, सरकारने दुष्काळ जाहीर केला असला, तरी शेतकरी विम्याला पात्र होत नाही. महसूल व कृषी खात्यातील भ्रष्ट अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांचे उंबरठा उत्पन्न जास्त दाखवून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून अपात्र ठरवले जाते, असा आरोपही त्यांनी केला. शासनाने रद्द केलेले कांदा निर्यात अनुदान पुन्हा सुरू करावे, तसेच बांगलादेशमध्ये कांदा आयातीवर लावलेले आयात शुल्क तत्काळ माफ केले नाही, तर केंद्र व राज्य सरकारच्या मंत्र्यांवर कांदे फेकू असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांवर अन्याय होत असतांना सरकार काय करतंय, असा सवाल त्यांनी यावेळी केली. कांद्याला चांगला भाव मिळत असताना अचानक केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात अनुदान रद्द केले. त्यामुळे कांद्याचे दर पुन्हा गडगडले आहे. देशात गरजेपेक्षा जास्त कांदा उपलब्ध असतानाही, सरकारने हे पाऊल उचलले आहे. सोबत केंद्र सरकारने ग्राहकांचे हित पाहण्यासाठी बांग्लादेशने लावलेला कांदा आयात शुल्क माफ करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यामुळे निर्यात अनुदान पुन्हा सुरू करावे. तसेच आयात शुल्क हटवावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी जेव्हडे प्रश्न मांडले, तेव्हडेच मंत्री झाल्यावर मांडतील, असे म्हणत त्यांनी विखेंना खोचक टोला लगावला, तर बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन करून 17 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत असून, त्यांनी सरकारला धारेवर धरावे, असेही ते शेवटी म्हणाले.


भाजप-शिवसेने विरोधात सर्वांनी एकत्र यावे
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेविरोधात सर्व विरोधकांची एकजूट व्हावी, यासाठी आपण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व प्रहारचे बच्चू कडू यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून, भाजप-शिवसेनेला पराभूत करण्यासाठी महाआघाडीतील सर्व घटकांनी एकत्रित येत निवडणूक लढवावी, असा आपला प्रयत्न आहे. स्वाभिमाना संघटना विधानसभेच्या सुमारे 20 ते 25 जागा लढविल, असेही माजी खा. राजू शेट्टी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.