मंथन – तत्वनिष्ठ, संवेदनशील नाटककार (भाग २)

मंथन – तत्वनिष्ठ, संवेदनशील नाटककार (भाग १)

मानवेंद्र उपाध्याय, समीक्षक

तत्त्वचिंतक नाटककार, दिग्दर्शक आणि संवेदनशील कलावंत गिरीश कर्नाड यांची एक्‍झिट ही साहित्य आणि नाट्यविश्‍वासाठी अत्यंत दुःखद घटना होय. पौराणिक आणि ऐतिहासिक कथांमधून तत्कालीन व्यवस्थेचा शोध घेणारा अत्यंत अभ्यासू नाटककार हीच कर्नाडांची खरी ओळख. जाणकारांशी चर्चा करून विषय समजून घेऊन मगच नाटक लिहायला घ्यायचे, हा शिरस्ता पाळणारे कर्नाड देशविदेशात ख्यातकीर्त ठरले. आपल्या भोवतालाविषयी रोखठोक भूमिका मांडणाऱ्या या नाटककाराच्या जाण्यामुळे खऱ्या अर्थाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

1942 मध्ये वडील निवृत्त झाले; पण युद्ध सुरू असल्यामुळे त्यांच्या सेवेत वाढ करून कर्नाटकातील सिरसी येथे त्यांची बदली करण्यात आली. इथेच गिरीश कर्नाडांना “यक्षगान’ या लोकनाट्याचे दर्शन प्रथम घडले. इतरही नाटके पाहायला मिळाली. पुराणकथा, ऐतिहासिक कथा ऐकायला मिळाल्या. नंतर कर्नाड कुटुंब धारवाडमध्ये स्थायिक झाले. डी. आर. बेंद्रे यांच्या कविता ऐकणे, त्यांच्या घरी जाणे-येणे, तसेच कर्नाटक महाविद्यालयात सुरू असलेली साहित्यिक चळवळ याचा गिरीश कर्नाडांवर मोठा प्रभाव पडला आणि तेही लिहिते झाले. कीर्तिनाथ कुर्तकोटी यांच्या विचारांचा प्रभाव आणि जी. बी. जोशी यांच्या माध्यमातून मनोहर ग्रंथमालेत मिळालेला प्रवेश यामुळे कर्नाड यांचे साहित्यविश्‍व विस्तारू लागले. भाषा अधिक परिणामकारकपणे कशी वापरायची, हे लक्षात आले.

इंग्लंडमध्ये गेल्यानंतर कर्नाड यांना कवी बनण्याची स्वप्ने पडू लागली होती. परंतु 1951 मध्ये सी. राजगोपालाचारी यांचे “महाभारत’ प्रकाशित झाले, तेव्हापासून महाभारतातील संवाद त्यांच्या मनात घोळू लागले. ते त्यांनी कागदावर उतरवायला सुरुवात केली आणि “ययाती’ नाटकाचा जन्म झाला. 1963 मध्ये ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमधून राजीनामा देऊन पूर्णवेळ लेखनाला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. “द मद्रास प्लेअर्स’ या नाट्यसंस्थेतून ते नाटक करू लागले. नंतर एका पाठोपाठ एक नाटके त्यांनी लिहिली. यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित “सम्सकारा’ चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. 1986-87 मध्ये गाजलेल्या “मालगुडी डेज्‌’ या बहुचर्चित दूरचित्रवाणी मालिकेत त्यांनी काम केले तर 1990 मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन देणाऱ्या “टर्निंग पॉइंट’ या दूरदर्शनवरील मालिकेचे “होस्ट’ म्हणून ते आपल्याला दिसले. चित्रपटांमधून लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून आपल्याला भेटले.

गिरीश कर्नाड यांच्या घडणीच्या काळात नाट्यसंस्थांचा मोठा प्रभाव समाजावर होता. आईवडिलांबरोबर नाटक पाहायला ते नेहमी जात असत. तेव्हापासूनच नाटकाने त्यांच्या मनात घर करायला सुरुवात केली होती. त्यातच “यक्षगान’चे संस्कार त्यांच्यावर झाले आणि लोकसंस्कृतीशी जवळून परिचय झाला. दोन बहिणी, एक भाची आणि समोर राहणाऱ्या कुटुंबातील चार मुली यांच्यासमवेत आपण लहानाचे मोठे झाल्यामुळे महिला कशा प्रकारे विचार करतात, याचे आकलन आपल्याला उत्तमरीत्या झाले, असे कर्नाड सांगत असत. या पार्श्‍वभूमीनेच त्यांच्यात संवेदनशीलतेची पेरणी झाली, असे म्हणता येईल. त्यांच्या नाटकातील महिला व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावी असण्याचेही हेच कारण आहे. त्यांनी जेव्हा नाट्यलेखन सुरू केले, तेव्हा कन्नड नाटकांवर पाश्‍चात्य शैलीचा मोठा प्रभाव होता. “सम्सकार’ चित्रपटापासून त्यांनी अनेकदा पटकथालेखन, चित्रपट दिग्दर्शन आणि अभिनय केला असला, तरी त्यांचा खरा ओढा नाटकाकडेच राहिला. नाटकाच्या शैलींमध्ये वेगवेगळे प्रयोग करणे चित्रपटाच्या दिग्दर्शनापेक्षा अधिक स्वतंत्रपणाचा अनुभव देणारे असते, असे त्यांना वाटत असे.

पौराणिक आणि ऐतिहासिक कथांवर नाटके लिहिणे मुळातच आव्हानात्मक असते. गिरीश कर्नाड यांच्या नाट्यलेखनाची पद्धत मात्र अधिक अचूक आणि समृद्ध होती. कोणत्याही ऐतिहासिक विषयावर नाटक लिहिण्यापूर्वी ते त्या विषयातील तज्ज्ञांना भेटून चर्चा करीत असत. नोट्‌स काढत असत. एकाच ठिकाणी बसून काम करणारे लेखक आणि कवींविषयी आपल्याला तिरस्कार वाटतो, असे ते उघडपणे बोलत. नाटक लिहिताना मेहनत घ्यावीच लागते, असे त्यांचे ठाम मत होते आणि त्यांची वाटचालही तशीच राहिली. “तुघलक’ नाटक जेव्हा त्यांनी लिहिले, तेव्हा कुणाला त्यात फारशी रुची वाटणार नाही, असे त्यांना प्रारंभी वाटले होते. परंतु तसे घडले मात्र नाही.

“तुघलक’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. “”नाटके लहान मुलांसारखी असतात आणि अंगी असलेल्या योग्यतेनुसारच त्यांची वाटचाल ठरते,” असे ते म्हणत. विषयाचे सर्व कंगोरे जाणून घेऊन अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने नाटक लिहिणारा हा सिद्धहस्त नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे एक संवेदनशील रंगकर्मी आपण गमावला आहे. गिरीश कर्नाड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Leave A Reply

Your email address will not be published.