नवी दिल्ली – इराणच्या मानवाधिकार (Iran) कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी (Nargis Mohammadi) यांना महिला अत्याचाराविरुद्धच्या जागतिक लढ्याबद्दल 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराने सन्मानित झाल्या असल्या तरिही नरगेस मोहम्मदी सध्या तुरुंगात आहेत.
“नॉर्वेजियन नोबेल समितीने नर्गिस मोहम्मदी यांना इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धच्या लढ्याबद्दल आणि जागतिक पातळीवर सर्वांसाठी मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी केलेल्या लढ्याबद्दल त्यांना 2023 चा देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे नोबेल पुरस्कार संयोजन समितीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
नर्गिस मोहम्मदी यांना इराण सरकारकडून एकूण 13 वेळा अटक करण्यात आली आहे. त्यांना विविध प्रकरणात गोवून पाच वेळा दोषी ठरवण्यात आले आहे. आपल्या आयुष्यात 31 वर्षे तुरुंगवास भोगलेल्या नर्गिस मोहम्मदी यांना 154 वेळा फटक्यांची शिक्षा देण्यात आली होती, असे नोबेल पारितोषिक प्रदान करणाऱ्या संस्थेच्या संकेतस्थळाने म्हटले आहे.
नर्गिस मोहम्मदी या इराणमधील प्रमुख मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. महिला हक्कांसाठी सर्वात वाईट देशांमध्ये इराणचा समावेश होतो. नैतिक पोलिसांच्या कोठडीत महसा अमिनी या तरुण कुर्दिश महिलेचा मृत्यू झाल्यानंतर देशात हिंसक निदर्शने सुरू झाली होती. दरम्यान, नर्गिस मोहम्मदीने महिलांच्या हक्कांसाठी आणि फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी मोहीम चालवली आहे.
नोबेल पारितोषिक विजेती नर्गिस मोहम्मदी सध्या इराणची राजधानी तेहरानमधील तुरुंगात देशाविरूद्ध प्रचार केल्याच्या आरोपांसाठी अनेक शिक्षा भोगत आहेत. त्यांनी महिलांच्या स्वातंत्र्याची मागणी केली. या निदर्शनात लाखो इराणी लोक सहभागी झाले होते. या संपूर्ण निदर्शनादरम्यान आंदोलकांनी महिला स्वातंत्र्याचे समर्थन केले आणि नर्गिस मोहम्मदी यांच्या मोहिमेला पूर्ण पाठिंबा दिला. नर्गिस मोहम्मदी यांच्यावर इराण सरकारविरोधात अपप्रचार केल्याचा आरोपही इराणी पोलिसांनी केला आहे.
नर्गिस मोहम्मदी या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राइट्स सेंटरच्या उपप्रमुख आहेत. ही एक स्वयंसेवी संस्था असून तिची स्थापना शिरीन एबादी यांनी केली आहे. शिरीन यांना 2003 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे.