मुंबई – राज्यात भाजपला दूर करून शिवसेनेने सत्तास्थापन केली. मात्र भाजपने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्लेस सुरुच ठेवले आहेत. त्यातच महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी एमआयएमने प्रस्ताव ठेवल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. त्यावर आता भाजपनेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी अत्यंत हिन भाषेत मविआवर टीका केली.
आमदार नितेश राणे हे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले. तुळजाभवानी देवीच्या मंदिरातच नितेश राणे यांनी राष्ट्रवादीवर अश्लील टीका केली.
राणे म्हणाले की, ‘लग्नाचा प्रस्ताव एमआएएमने दिला आहे, तो स्वीकारावा का नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या घरात कोण कुणासोबत …… हा आमचा प्रश्न नसून भाजप स्वबळावर 2024 मध्ये सत्ता स्थापन करेल’ असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंनी केलं.
राष्ट्रवादी दाऊदची बी टीम महाराष्ट्र सरकारमध्ये राज्य करते. त्यामुळेच नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही. मलिक यांचा राजीनामा जर घेतला तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाऊदला उत्तर द्यावे लागेल, अशी टिप्पणी नितेश राणे यांनी केली.