पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्याला हादरवून सोडणाऱ्या मावळातील कोथुर्णे- पवनानगर येथील चिमुकलीवर अत्याचार-खून प्रकरणाची अत्यंत जलदगतीने सुनावणी घेतल्याने “निर्भया’ला न्याय मिळाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने केलेला तपास आणि अन्य पुरावे महत्त्वाचे ठरले.
आरोपी नराधम तेजस उर्फ दादा महिपती दळवी याला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते. तसेच हातात सुरा असलेले फोटो तो नेहमीच सोशल मीडियावर टाकायचा. घटनेच्या दिवशी दि. २ आॅगस्ट २०२२ रोजी नागपंचमीच्या सुटीमुळे तो घरीच होता. दुपारच्या सुमारास घराशेजारी खेळत असलेल्या चिमुकलीला त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेत मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखविले आणि अत्याचार केला. त्याला विरोध केल्याने आरोपीने चिमुकलीचा गळा आवळला.
त्यात ती गतप्राण झाल्याचे समजून तिला मोरीत टाकले. मात्र, तिचा आवाज आल्यावर आरोपीने चाकूने तिच्या गळ्यावर चार वेळा वार करून तिचा निर्घृण खून केला. तिचा मृतदेह पोत्यात टाकून घरामागे पुरला. त्यावर झाडाच्या फांद्या लावून त्याने गावातून पुण्याच्या दिशेने पळाला. इतके निर्दयी कृत्य करूनही तो अत्यंत शांतपणे दुसऱ्या दिवशी तो थेट कामावरही निघून गेला. पुढे पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या कृत्याचे बिंग फुटले.
विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी एकूण २९ साक्षीदार तपासले. चिमुकलीला आरोपीसोबत पाहणारी गावातील महिला, मुलीचे शवविच्छेदन आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर आणि आरोपीच्या घरझडतीच्या वेळी उपस्थित सरकारी पंच यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने लैंगिक वासना शमविण्यासाठी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचा खून केला असून, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला.
त्यासाठी त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या निवाड्याचे दाखले दिले, तसेच दिल्लीतील “निर्भया’ प्रकरणानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ एबी तरतुदीत झालेल्या बदलांचा आधार घेत आरोपीला “डेथ पेनल्टी’ देण्याची मागणी केली. बचाव पक्षातर्फे अॅड. यशपाल पुरोहित यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपीचे म्हणणेही ऐकून घेतले. त्यावेळी आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवशेषही नव्हता.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत मिळणार कधी ?
ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी निषेध मोर्चे काढले. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ ऑगस्ट २०२२ रोजी पीडितेच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, अद्याप सरकारी मदतीची प्रतीक्षाच असल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले.
मुलीसोबत अत्यंत घृणास्पद प्रकार घडला होता. ती एकुलती एक मुलगी होती. घराच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीनेच हे कृत्य केले. त्याला आता मरणयातना कळायला हव्यात. त्याच्या आईला आणखी शिक्षा व्हायला हवी होती. यामुळे काही अंशी का असेना, आमच्या मुलीला न्याय मिळेल. – चिमुकलीचे वडील