नगर -जिल्ह्यात आज मंगळवारी पुन्हा नऊ जणांना करोनाची लागण झाली आहे. नगर शहर, संगमनेर, राहाता येथे हे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा 226 इतका झाला आहे.
संगमनेर शहरातील पाच जणांना करोनाची लागण झाली असून, मदिनानगर येथील तेवीस वर्षीय महिला व 52 वर्षीय व्यक्तीला, तर पुनानाका, नाईकवाडपुरा येथील 35 वर्षीय व्यक्तीस यापूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे. तसेच मुंबईहून संगमनेर येथे आलेला 18 वर्षीय युवक करोनाबाधित आढळला आहे.
राहाता तालुक्यातील दोघे जण करोनाबाधित असून, निमगाव निघोज येथील 23 वर्षीय व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह, तर राहाता शहरातील बोठेगल्ली येथील 36 वर्षीय व्यक्ती करोनाबाधित आढलला. नगर शहरातील पंचपीर चावडी माळीवाडा येथील एकूण 69 वर्षीय व्यक्ती बाधित असून, यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात पंचपीर चावडी माळीवाडा येथील 23 वर्षे युवकाला करोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान आज अकोले, संगमनेर व शेवगाव येथील प्रत्येकी एक, तर केडगावच्या दोघांनी करोनावर मात केल्याने त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील 141 करोनाग्रस्त रुग्ण बरे झाले आहेत. तसेच तीन करोनाबाधित महिलांचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला आहे. या तीनही महिला संगमनेर तालुक्यातील आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात आता करोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे.