पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे, माहिती-तंत्रज्ञान कायदा, दंगल घडविणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. वागळे यांनी याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठविले आहे.
पर्वती पायथा परिसरातील साने गुरुजी स्मारकाच्या आवारात ९ फेब्रुवारी रोजी निर्भय बनाे सभेचे आयोजन करण्यात आले होते. वागळे यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने वागळे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला होता. सभेसाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मोटारीवर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला, असा आरोप वागळे यांनी निवेदनात केला आहे.