Nikhil Gupta : अमेरिकन नागरिक आणि खलिस्तानी कट्टरवादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेत भारतीय नागरिक निखील गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. चेक प्रजासत्ताकच्या तपास यंत्रणेने गुप्ता यांना ताब्यात घेतले आहे. अमेरिकेने गुप्ता यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप करून त्यानंतर ही कारवाई केली होती. दरम्यान, आता गुप्ता यांच्या मदतीसाठी भारतीय पराष्ट्र मंत्रालय सरसावले असल्याचे दिसत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागचीयांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकारकडून निखिल गुप्ता यांना आवश्यक राजनैतिक मदतही देत असल्याचे बागची यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत निखिल गुप्ता यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बागची यांनी, ‘एक भारतीय नागरिक सध्या चेक अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली असून ती अद्याप प्रलंबित आहे. आम्हाला किमान तीन वेळा काउंटर ऍक्सेस मिळाला आहे. आम्ही गरजेनुसार आवश्यक राजनैतिक मदत देत आहोत.अशी महत्वपूण माहिती त्यांनी यावेळी दिली.
निखिल गुप्ता यांचा अमेरिकेत असणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप अमेरिकन सरकारने केला आहे. अमेरिकेच्या आरोपानंतर ५२ वर्षीय निखिल गुप्ता यांचे कुटुंबीय गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात गेले होते. गुप्ता यांच्या प्रत्यार्पण प्रकरणात केंद्र सरकारला हस्तक्षेप करून या प्रकरणात निष्पक्ष खटला चालवण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका येथे दाखल करण्यात आली होती.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, ‘या व्यक्तीचे कुटुंब आमच्या सर्वोच्च न्यायालयात गेले आहे आणि ही एक प्रक्रिया आहे जी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. अधिकारक्षेत्रासारख्या मुद्द्यांवर भाष्य करणे आम्हाला योग्य वाटत नाही. सुप्रीम कोर्ट काय म्हणते ते पाहण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू. असे बागची यांनी यावेळी म्हटले. अमेरिकेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारताने यापूर्वीच चौकशी समिती स्थापन केली आहे. भारताने यापूर्वीच अमेरिकेचे आरोप गांभीर्याने घेतल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेच्या फेडरल वकिलांनी निखिल गुप्ताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात गुप्ता भारत सरकारच्या एका कर्मचाऱ्यासोबत काम करत होते, ज्याचा उद्देश पन्नूची हत्या करण्याचा होता. मात्र, या हत्येचा कट अमेरिकन अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. गुरुपतवंत सिंग पन्नू यांच्याकडे अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. न्यूयॉर्कमध्ये राहत असताना तो अनेकदा भारतविरोधात वक्तव्ये करत होता.