Nihar Thackeray on Shivsena – एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. शिंदे यांनी केवळ शिवसेनेचे आमदार, खासदारच स्वतःकडे वळवून घेतले नाहीत तर शिवसेना पक्षावर देखील हक्क सांगितला आहे. शिंदे यांच्या बंडामुळे एकीकडे उद्धव ठाकरे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडताना दिसतायेत तर दुसरीकडे त्यांना मूळचा शिवसेना पक्ष आपल्याकडेच राहावा यासाठी देखील लढाई लढायची आहे. अशातच आज बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी शिवसेना पक्षावर हक्क कोणाचा याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले निहार ठाकरे? । Nihar Thackeray on Shivsena
पक्षावर नेमका दावा कोणाचा? ठाकरे की शिंदे यांचा याबाबत वाद-विवाद सुरु असतानाच निहार ठाकरे यांनी, “एकनाथ शिंदे यांच्या बाजुने बहुसंख्य खासदार आणि आमदार आहेत, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, वेळ आल्यावर आम्ही नक्की बहुमत सिद्ध करू… कारण बहुमत आमच्याच बाजुने आहे. निवडणूक आयोगही आमच्याच बाजुने निर्णय देईल, अशी मला अपेक्षा आहे. तसेच शिवसेनेचं मूळ चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अर्थातच शिंदे गटाला मिळेल.” अशी भूमिका मांडली आहे.
निवडणूक आयोगाकडून ठाकरेंना दणका
शिवसेना पक्षावर आपलाच दावा असल्याचं निवडणूक आयोगासमोर सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिवसैनिकांची प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली प्रतिज्ञापत्रे विहित नमुन्यात सादर केली नसल्याचा ठपका ठेवत ती रद्द केली आहेत. आयोगाकडून सुमारे अडीच ते तीन लाख प्रतिज्ञापत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.
शिवसेना व धनुष्यबाण कोणाचा? निवडणूक आयोग देणार कौल
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार मूळचा शिवसेना पक्ष कोणाचा व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगाच्या दरबारी पुन्हा सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व धनुष्यबाण गोठवले असून ठाकरे व शिंदे गटाला तात्पुरत्या स्वरूपाची पक्षाची नावं व चिन्हं दिली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग पुढे शिवसेना व धनुष्यबाणावर कोणाचा हक्क मान्य करतो हे पाहावे लागेल.