पुणे : लोअर बिबवेवाडीत भर रस्त्यात खुनाच्या प्रयत्नाचा थरार घडला. किरकोळ कारणावरुन एका तरुणावर दोघांनी चाकूने सपासप वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या दुकानदारांना चाकूची दहशत दाखवत दम दिल्याने सगळे दुकानदार पटापट दुकाने बंद करुन पळून गेले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. जखमी तरुणाने शनिवारी तक्रार दाखल केल्यावर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सुरज अनंत कामथे (29,रा.शिल्पलेख सोसायटी, धनकवडी) याने दिलेल्या फिर्यादीनूसार सौरभ भगत (24,रा.सहकारनगर) व राजू नावाच्या व्यक्तीविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी सुरज व आरोपी सौरभ तोंडओळखीचे आहेत. सौरभने सुरजकडून त्याचे सिमकार्ड एक दिवसासाठी वापरण्यास मागितले होते. त्याने हे सिमकार्ड त्याच्याकडील मोबाईलमध्ये टाकून पुन्हा सुरजला दुसऱ्या दिवशी दिले. दरम्यान सुरजला राजगड पोलिस ठाण्यातून फोन आला की तुम्ही ज्या मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकले आहे, तो चोरीचा आहे.
तुम्ही तातडीने तो पोलिस ठाण्यात आणून जमा करा. ही बाब सांगण्यास सुरज हा आरोपी सौरभच्या घरी गेला होता. मात्र तेथे सौरभ नसल्याने त्याने घरातील एका महिलेला ही बाब सांगितली. याचा राग येऊन सौरभने साथीदारासह ऍक्टिव्हावरुन येऊन सुरजला लोअर बिबवेवाडी येथे गाठले. तेथे त्याच्या तोंडावर धारदार चाकूने दोन वार केले. तर त्याचा साथीदार राजू याने दगड पाठीवर फेकून मारला. यानंतर सुरजला जमिनीवर पाडून त्याच्या छातीवर, हातावर आणी पाठिवर चाकूने सपासप वार केले. ही घटना आजूबाजूचे नागरिक आणी दुकानदार पहात होते. ते सुरजला सोडवण्यास येत असतानाच आरोपीने हातातील चाकू उगारुण कोणमध्ये येतो, त्याला खल्लास करुन टाकतो अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेले नागरिक व दुकानदार दुकाने बंद करुन पळून गेले. दरम्यान गंभीर जखमी झालेला सुरज ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक के.बी.पावसे करत आहेत.