मुंबई – मुंबई पोलीस दलातील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना काही दिवसांपूर्वी एनआयएच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर आता प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. एनआयएच्या टीमने प्रदीप शर्मा यांच्या कार्यालयावर छापेमारी करत आणखी एक कारवाई केली आहे. यामुळे प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत भर पडण्याची चिन्हे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते आणि मुंबई पोलीस दलातील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट असलेले प्रदीप शर्मा यांच्या पीएस फाउंडेशन या एनजीओवर एनआयएच्या पथकाने छापेमारी केली आहे. एनआयएने ही कारवाई नेमकी कुठे केली आहे, याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या एनजीओच्या कार्यालयावर एनआयएच्या टीमने छापा टाकल्याची माहिती समजते.
दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएने प्रदीप शर्मा यांना 17 जून रोजी अटक केली. 17 जून रोजी एनआयएच्या टीमने प्रदीप शर्मा यांच्या घरावर सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. अंधेरीतील त्यांच्या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर एनआयएच्या टीमने लोणावळ्यातून प्रदीप शर्मा यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर एनआएने त्यांना अटक केली. प्रदीप शर्मा यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, 28 जूनपर्यंत एनआए कोठडी सुनावण्यात आली आहे.