नवी दिल्ली – दहशतवादी कृत्ये आणि धर्माच्या आधारावर शत्रुत्व वाढवण्यासाठी कथितपणे प्रशिक्षण शिबिरे चालविल्याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात एनआयएने रविवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत एनआयएने आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये 40 ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या संबंधित अधिका-यांनी सांगितले की, तेलंगणातील 37, तर आंध्र प्रदेशमधील दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत काही डिजिटल साहित्यासह महत्वाची कागदपत्रे, दोन खंजीर आणि रोख 8 लाख 31 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले. तेलंगणामधील निजामाबाद येथे सर्वाधिक 23 ठिकाणी छापे टाकण्यात आले. याशिवाय हैदराबादमध्ये चार, जगत्यालमध्ये सात, निर्मलमध्ये दोन, दिलाबाद आणि करीमनगर जिल्ह्यात एक-एक ठिकाणी, तर आंध्र प्रदेशमधील कुरनूल आणि नेल्लोर जिल्ह्यात छापेमारी करण्यात आली. या तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आलेले चारही आरोपी दहशतवादी कृत्य करण्यासाठी आणि धर्माच्या आधारावर लोकांमध्ये वाद वाढावा, यासाठी शिबिरांचं आयोजन करत होते, असेही एनआयएने सांगितले.