पुणे -केंद्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने रविवारी पुण्यातील एका शाळेचे दोन मजले सील केल्याची बातमी वाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मुस्लीम युवकांना कट्टरपंथी बनवण्यासाठी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल एनआयएने ही कारवाई केली आहे. या शिबिरांमध्ये एका विशिष्ट संघटनेच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी व विशिष्ट समुदायाच्या विरोधात टार्गेट किलींगचे प्रशिक्षण दिले जात असल्याचाही आरोप आहे.
एका संकेतस्थळावर एनआयएच्या हवाल्याने देण्यात आलेल्या बातमीत म्हटले आहे की एनआयएने शाळेच्या इमारतीचा चौथा आणि पाचवा मजला सील केला आहे. बंदी घातलेल्या पीएफआय या संघटनेच्या दहशवादी कारवायांच्या तयारीसाठी इमारतीचा वापर केला जात होता. भोळ्याभाबड्या मुस्लीम युवकांना या शिबिरांमध्ये दाखल केले जात होते व त्यांना प्रशिक्षण दिले जायचे. एवढेच नाही तर भारतात 2047 पर्यंत इस्लामची राजवट स्थापन करण्यास विरोध करणाऱ्यांना संपवणे आणि त्यांची हत्या करण्यासाठी येथे शस्त्रांचे व अन्य प्रशिक्षण दिले जात होते असेही म्हटले आहे. एनआयएने 18 मार्च रोजी दिल्लीतील विशेष न्यायालयात 20 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
त्यात पीएफआयचाही समावेश आहे. संबंधित शाळेत गेल्या वर्षी 22 सप्टेंबर रोजी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती त्यानंतर आता शाळेचे दोन मजले ताब्यात घेण्यात आले आहेत. एनआयएला त्यावेळच्या झडतीत अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या होत्या. त्यावरूनच ही बाब उघड झाली होती की संबंधित जागेचा उपयोग पीएफआयकडून त्यांच्या लोकांना शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी केला जात होता. एकप्रकारे सामान्य मुस्लिम युवकांना विशिष्ट समुदायाच्या विरोधात भडकावण्याचा प्रकारच येथे केला जात होता. नव्याने भरती झालेल्या युवकांना चाकू आणि अन्य शस्त्रे चालवून त्या समुदायाच्या नेत्यांना कसे लक्ष्य केले जाऊ शकते हे शिकवले जात होते.