मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा शरद पवार यांनी यावेळी केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या गळ्यात कार्यकारी अध्यक्षपदाची माळ शरद पवारांनी टाकली.
दरम्यान, या निर्णयानंतर अजित पवार हे नाराज असल्याचे राजकीय नेत्यांकडून विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. अशात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे. अजित पवार काही दिवसांत उठाव करतील, असं विधान केलं.
त्यांच्या या विधानावर आता एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीच्या पांडूरंगाची महापूजा करतील. यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांच्या राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल, असं विधान मिटकरी यांनी केलं.