ग्रामपंचायत दरानेच कर आकारावा; सुप्रिया सुळे यांचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन

वारजे – पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील नागरिकांना मिळकत कर गाव समावेशाच्या तारखेपासून पुढील वर्षाच्या 31 मार्चपर्यंत ग्रामपंचायतीच्या दरानेच आकारावा. याबाबतचा महाराष्ट्र महापालिका अधिनियम 129 अ (1) संबंधित भागांतील औद्योगिक क्षेत्र व व्यावसायिक गाळ्यांसाठीही लागू करावा, त्यानंतरच्या वर्षापासून महापालिकेच्या दराने करआकारणी व्हावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे, धायरी, वडगाव, खडकवासला या गावांतील नागरिकांनी याबाबत सुळे यांना निवेदन दिले होते, त्याची दखल घेत सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहिले आहे. सुळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिन दोडके, बाबा धुमाळ, अतुल दांगट, विकास दांगट, अविनाश जोगदंड, संजय धावडे, अतुल धावडे यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासमवेत बैठक घेत सविस्तर चर्चा केली.
महापालिकेत गाव समावेश झाल्यानंतर पुढील दरवर्षी मार्च महिन्यापासून सर्वसाधारण कर व इतर सेवाकर यांच्या एकत्रित बेरजेसह ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण करातील उर्वरित रकमेच्या 20 टक्के वाढीसह कर सध्या आकारण्यात आला आहे.





