मुंबई – “पुढच्या वेळी अजित दादाच मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय पूजा करतील…’, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच आपण संत तुकोबारायांच्या चरणी अशी प्रार्थना केली असल्याचे देखील अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
अमोल मिटकरी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहकुटुंब दाखल झाले आहे. तसेच वारकऱ्यांसोबत काही वेळ ते सहकुटुंब चालणार आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधला असता हे विधान केलं आहे.
यावेळी ते म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही शेवटची विठ्ठलाची पूजा असणार आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मुख्यमंत्री करणार आहोत.
त्यामुळे पुढच्या वेळी अजित पवारच मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय पूजा करतील…’ असं अमोल मिटकरी यावेळी म्हणाले आहे. सध्या त्यांचं हे व्यक्तव चांगलंच चर्चेत आलं असून, आगामी काळात राज्याच्या राजकारणात कोणती उलथापालथ होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
‘मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा…’- अजित पवार
“मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा अशी मागणी अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला असून, या निमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समोर अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करण्याची मागणी करताच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याचे वक्तव्य केल्यापासून पक्षामध्ये अनेक बदल होताना दिसून येत आहेत.