नवी दिल्ली – देशात हिंसक घटनांचं प्रमाण वाढलं आहे. मॉब लिंचिंगच्या घटना देखील ठरविक अंतराने घडत असतात. या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून द्वेषमुलक वक्तव्ये आणि अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांविरोधात आवाज उठवला आहे. तसेच तुमच्या मौनामुळे द्वेषाच्या आवाजाला प्रोत्साहन मिळत असल्याचा आक्षेप नोंदवला. हे ताजं असतानाच आता आणखी एका युवकाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण करत थुंकी चाटायला लावल्याची घटना समोर आली आहे.
झारखंडमधील ही घटना असून येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी युवकाला मारहाण करत जय श्रीरामच्या घोषणा देण्यास भाग पाडले. धक्कादायक बाब म्हणजे युवकाला मारहाण होत असताना भाजप खासदार पीएन सिन्हा, भाजप आमदार राज सिन्हा आणि इतर नेते तिथं उपस्थित होते.
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत गोंधळ झाला होता. या पार्श्वभूमीवर एका युवकाने झारखंड भाजपचे प्रमुख दीपक प्रकाश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यानंतर संतपलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लीम युवकाला बेदम मारहाण केली.
युवकाला मारहाण होत असताना वाहतुक पोलिस देखील उपस्थित होते. मात्र त्यांनी त्या युवकाला भाजप कार्यकर्त्यांच्या हातातून सोडविण्याचा प्रयत्न केला नसल्याचे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
युवकाला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेची दखल घेतली असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे.