पुणे – सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने त्यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्या प्रकरणी पुण्यात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना प्रश्न विचारला असता ते भडकले होते.
राणे यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की, राजकारणी सध्या ज्या भाषेत एकमेकांवर टीका करतात त्यावरून असे वाटते का महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर घसरलाय? यावर उत्तर देताना राणे म्हणाले की, महाराष्ट्राच्या शासनाचा आणि राजकारणाचाही स्तर घसरलेला नाही, तिथली माणसं कोणत्या पक्षात कुठल्या प्रकारची आहेत, त्यांची वैचारिक पातळी तपासण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे स्तर घसरू नये असे वाटते.
पत्रकारांनी दुसरा प्रश्न विचारला की, सध्या राजकारणात ज्या पद्धतीची टीका टीपण्णी होते, भाषा ज्या पद्धतीची वापरली जाते त्यामध्ये नितेश राणे, निलेश राणे यांचाही सहभाग असतो दुसऱ्याही बाजूने अनेक नेते त्याला प्रत्युत्तर देतात… या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नारायण राणे भडकले, जेव्हा प्रतिउत्तर देतात तेव्हा तुम्हाला माझी मुलं दिसतात, अन्य दुसरे दिसत नाही का ? तुम्हाला जर विकासाचं आणि चांगल्या कामाबद्दल विचारायचं असेल तर विचारा.. दुसऱ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी आलो नाही असे, नारायण राणे म्हणाले.
काय म्हणाले होते भास्कर जाधव ?
भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सिंधुदूर्ग जिल्ह्यात घणाघाती टीका केली. नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचे सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही. भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खाते म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. शिवसेनेने काही केले नाही, असे नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भदरात होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडले. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचे सांगितले. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडले.