…अन्यथा नागरी विमान वाहतूक क्षेत्रावर परिणाम होणार

स्पाईसजेट मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सिंह; सरकारच्या धोरणात बदल होण्याची गरज;  यांनी मांडले मत

सोल – केंद्र सरकारने नागरी विमान वाहतूक धोरणांमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. अन्यथा जेट एअरवेजप्रमाणे इतर कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो असे स्पाईसजेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सिंह यांनी सांगितले.

ते म्हणाले की, भारतातील दोन दशकापासून यशस्वीपणे चालणारी जेट एअरवेज कंपनी आता मर्यादित काळासाठी बंद झाली आहे. यावरून सरकारने बोध घ्यावा. व्यवस्थापनच ही कंपनी बंद होण्यास पूर्णतः जबाबदार आहे असे समजले जाऊ शकत नाही. इतर कंपन्यांवरही सरकारच्या नकारात्मक धोरणाचा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात विमानाच्या इंधनावर मोठ्या प्रमाणात कर लावले जातात. आवश्‍यकतेपेक्षा जास्त कंपन्या कार्यरत आहेत. यामुळे स्पर्धा वाढून तिकिटाचे दर किफायतशीर राहात नाहीत. विमानतळावरही विमान कंपन्यांना विविध सेवासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम मोजावी लागते.

विमानाचे सुटे भाग विमान कंपन्यांना आयात करावी लागतात. त्या सुट्ट्या भागावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावले जाते. या सर्व बाबींमुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढतो. मात्र, त्या प्रमाणात महसूल वाढत नाही. भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्र आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. मात्र खर्चामुळे हे क्षेत्र डबघाईला आलेले आहे. सरकारची स्वतःची कंपनी असलेली एअर इंडिया कर्जाच्या ओझ्याखाली आलेली आहे.

या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून हे क्षेत्र पुरेशा वेगाने वाढावे यासाठी सरकारने आपल्या धोरणात काही बदल करण्याची गरज आहे. अशा प्रकारची मागणी गेल्या दहा वर्षापासून अनेकांनी केली असूनही याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे.

“सरकारने धोरण बदलले नाही तर जेट एअरवेजप्रमाणेच इतर विमान कंपन्यांच्या महसूल आणि नफ्यावर परिणाम होईल. इंधनाचे दर, सुट्ट्या भागावरील आयात कर, विमानतळावरील शुल्क या क्षेत्रात सरकारने शिथिल धोरण अवलंबण्याची गरज आहे.
-अजय सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्पाईस जेट

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.