Rohit Pawar ED Enquiry – बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी पूर्ण झाली आहे. रोहित पवार यांची आज जवळपास साडे आठ तास चौकशी झाली. दुपारी 12 वाजताच्या सुमारास ते बॅलॉर्ड पीअर येथील ईडी कार्यालयात दाखल झाले होते. याआधी ईडीकडून रोहित पवारांची 24 जानेवारीला तब्बल 11 तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले होते.
रात्री 9.15 च्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. बारामती अॅग्रो प्रकरणात रोहित पवारांची ही चौकशी करण्यात आली. रोहित पवारांच्या या चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी घंटानाद करण्यात आला.
रोहित पवार म्हणाले, “देशात आणि महाराष्ट्रात लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, तपास यंत्रणांच्या माध्यमातून जो काही प्रयत्न होतोय त्याला विरोध करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपोषण करत आहेत. त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी उपोषण मागे घ्यावं”, असं रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “मी ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की, राज्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या पदाधिकारी, नागरीक, कार्यकर्त्यांनी लोकशाहीचा आवाज ज्या पद्धतीने दाबला जातोय, तसंच सामान्य माणसांच्या मुद्द्यावर चर्चा केली जात नाही, त्यामुळे सामान्य लोकांच्या वतीने लढत असताना आपल्यावर कारवाई होत असेल, तर ते जिल्ह्यांमध्ये सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लढले, कलेक्टर, तहसीलदारांना भेटले, त्यांनी आंदोलन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जनतेचा आवाज त्यांनी शासनापर्यंत पोहोचवला”, असं रोहित पवार म्हणाले.