नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची पोलिसांनी झाडा झडती घेतली. त्यामध्ये सापडलेला आयपॅड हा मुंबई येथील फॉरेन्सिक लॉबला पाठविण्यात येणार आहे. त्यातून काही महत्त्वाचे पुरावे पोलिसाच्या हाती लागण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
रेखा जरे खून प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील घराची पोलिसांनी शुक्रवारी (दि. 19) रोजी झाडाझडती घेतली. त्यामध्ये आयपॅडसह काही महत्त्वाच्या वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीतील जातेगाव घाटात दोघा जणांनी गळा चिरून हत्या केली होती. त्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या पाच संशयित आरोपींना जेरबंद होते. मात्र, या घटनेत मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे तपासात समोर आले.
तेव्हा पासून बोठे गेल्या 102 दिवसांपासून फरार होता. त्याला पोलिसांनी हैदराबाद येथील बिलाल नगर परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली. अटक केल्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. काल त्याला पारनेर न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोतवालीच्या गुन्ह्यात वर्ग करणार!
रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कोतवालीच्या गुन्ह्यात वर्ग करण्याच्या हालचाली कोतवाली पोलिसांनी सुरु केल्याचे समजते. त्यामुळे पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतरही बोठेच्या अडचणीत कमी होण्याची चिन्हे नाहीत. कोतवाली पोलीस ठाण्यात बोठे विरुद्ध एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे.