पुणे- शहरात लागू केलेल्या दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनमध्ये शनिवार आणि रविवारी केवळ दूध विक्रीची दुकाने आणि मेडीकल सुरू राहणार आहेत. त्या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे सुधारित आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी काढले. तर, या दोन दिवसांत पीएमपीसह रिक्षा सेवा पूर्णत: बंद राहणार असल्या तरी त्याचवेळी आयुक् तांकडून अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासी कॅबच्या वापरास मंजूरी दिली आहे. ही सेवासुद्धा दवाखान्यात जाणे तसेच लसीकरणासाठी जाताना वापरता येणार आहे. तसेच या दोन दिवसांत, शहरात लसीकरण नियमित सुरू राहणार आहे.
विकेंड लॉकडाऊनमध्ये नेमके काय सुरू आणि काय बंद याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती होती. त्याबाबत वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांकडून वेगवेगळे नियम सांगण्यात येत होते, ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांकडून सुधारीत आदेश काढले आहेत.
या पूर्ण लॉकडाऊनच्या दोन दिवसांच्या कालावधीत स्पर्धा परीक्षा तसेच सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घर ते परीक्षा केंद्रापर्यंत प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. याशिवाय, या दोन दिवसांत केवळ दूध विक्रीची दुकाने सुरू राहणार असून त्यांना सकाळी 6 ते 11 या वेळेत परवानगी असणार आहे. तर, ऑनलाइन सेवा पुरविणाऱ्या ई- कॉमर्स कंपन्यांचे कामही या दोन दिवसांत सुरू राहणार असून त्यांच्यासह एमपीएससी विद्यार्थ्यांसाठीच्या खानावळी सर्व दिवस सकाळी 7 ते सायंकाळी 8 या वेळेत पार्सल सेवेसाठी सुरू राहणार आहेत.
या घटकांसोबतच दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनमध्ये घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिकांचे मदतनीस, नर्स यांना आठवड्याचे सातही दिवस सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत प्रवासाची मुभा राहणार आहे.
मद्यविक्रीची घरपोच सुविधा
महापालिका आयुक्तांकडून विकेंड लॉकडाऊनसोबतच येत्या सोमवारपासून अत्यावश्यक सेवा आणि जिवनावश्यक सेवांच्या दुकानांसह शहरातील चष्म्याची दुकाने तसेच शहरातील मद्यविक्रीची दुकाने सुरू केली जाणार आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 7 पर्यंत चष्म्याची दुकाने सुरू राहतील, तर मद्यविक्रीच्या दुकानांना सोमवार सकाळी सात ते शुक्रवार सायंकाळी 6 पर्यंत घरपोच विक्री सेवा देण्यास मुभा असणार आहे.