पुणे – केंद्राकडून राज्याला शुक्रवारी करोना प्रतिबंधक लसीचे 4 लाख 59 हजार लसींचे डोस मिळाले; तर 12 एप्रिलपर्यंत सुमारे साडेबारा लाख लसींचे डोस मिळण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यात शुक्रवारी लसींचा तुटवडा निर्माण झाला त्यामुळे राज्यात काही ठिकाणी लसीकरण झाले नाही तर काही ठिकाणी कमी झाले. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी केंद्रावर टीका करण्याला सुरूवात केली. विरोधी पक्षांनी तर केंद्र दुजाभाव करत असल्याचाच आरोप करत काही आकडेवारी नाचवली.
शुक्रवारी केंद्र सरकारने राज्याला 4 लाख 59 हजार डोस दिले. येत्या रविवारी सुमारे 2 लाख 83 हजार लस केंद्राकडून मिळणार आहे. असे एकूण 7 लाख 42 हजार लस “कन्फर्म’ मिळणार आहेत. याशिवाय 12 तारखेला किंवा त्यानंतर एक दोन दिवसांत आणखी पाच ते साडेपाच लाख लसींचे डोस महाराष्ट्राला मिळू शकणार आहेत.
पुणे विभागाला यातील त्यांचा कोटा मिळणार असून, जिल्ह्याकडून आता तो पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे ग्रामीण येथे वितरित केला जाणार आहे.
लसींचे लगेचच वितरण…
पहिला 4 लाख 59 हजार लसींचा साठा आल्यानंतर सांगली, कोल्हापूर, मुंबई, पनवेल, पुणे, सातारा यांना तो वितरित करण्यात आले आहेत. याशिवाय रविवारी जो साठा येईल, तो देखील पुणे आणि अन्य शहरांना लगेचच वितरित करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. डी. एन. पाटील यांनी सांगितले. ज्या विभागांनी वेगाने आणि सुरळीत लसीकरण केले आहे त्यांना प्राधान्य देण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.