नवी दिल्ली -मुंबईतील रस्त्यांवर गुरूवारी रात्री प्रत्यक्षदर्शींना बॉलीवूड स्टाईल थरार पाहावयास मिळाला. एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरचा पाठलाग करून सीबीआय अधिकाऱ्याने चक्क प्राप्तिकर विभागाच्या निरीक्षकाला पकडले.
करचुकवेगिरीचा आरोप असणाऱ्या मुंबईतील एका व्यक्तीशी संबंधित ठिकाणांवर काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. लाचेच्या बदल्यात त्या व्यक्तीला दिलासा देण्याची हमी प्राप्तिकर विभागाच्या तीन अधिकाऱ्यांनी दिली. त्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे लाचेची मागणी केली. त्याबाबतची तक्रार करचुकवेगिरीचा आरोप असणाऱ्या व्यक्तीने सीबीआयकडे नोंदवली. त्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी आशिष कुमार हा प्राप्तिकर विभागाचा निरीक्षक मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात येणार असल्याची माहिती सीबीआयला मिळाली. त्यावरून संबंधित भागात सीबीआय पथकाने सापळा रचला.
तक्रारदार व्यक्तीच्या कारमध्ये कुमारने 5 लाख रूपयांची लाच स्वीकारली. ती रक्कम बॅगेत भरून कुमार कारमधून उतरला. तो उरतताच सीबीआयचे पथक पुढे सरसावले. अडचणीत आल्याची जाणीव झाल्याने कुमारने रस्त्यातच पैशांनी भरलेली बॅग फेकून पळ काढला. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची पर्वा न करत सीबीआय अधिकाऱ्याने कुमारचा पाठलाग सुरू केला आणि त्याला पकडण्यात यश मिळवले. त्यानंतर सीबीआयने कुमारवर अटकेची कारवाई केली.