पुणे – वर्षभरापूर्वी कोथरुड भागातून वाहने चोरून पसार झालेल्याला पोलिसांनी अटक केली. त्याने पोलिसांपासून बचाव होण्यासाठी स्वत:चा मृत्यू बनाव रचला. मध्यप्रदेशात नातेवाईकांमार्फत मृत्यूची बातमीही प्रकाशित केली. पण, चोरटा हयात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला गजाआड केले.
विवेक मिश्रा (रा. महेर, जि. सतना, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मिश्रा याचे कोथरुड भागात पंक्चरचे दुकान होते. वर्षभरापूर्वी त्याने कोथरुड परिसरातून मोटार, तर पौड परिसरातून दुचाकी चोरून मूळगावी पळाला. तेथे त्याने नातेवाईकाला हाताशी धरून स्वत:च्या मृत्यूची बातमीही प्रकाशित केली. दरम्यान, मिश्राच्या तपासासाठी पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात गेले होते. तेव्हा नातेवाईकांनी मृत्यूच्या बातमीचे कात्रण त्यांनी तपास पथकाला दाखविले होते, असे कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.
पण, पोलिसांच्या तपासात मिश्रा हयात असल्याची माहिती मिळाली. चोरी केलेली मोटार तो वापरत होता. मोटारीच्या वाहन पाटीवरील क्रमांक बदलून तो पुण्यात आल्याची माहिती तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक माळी, दहिभाते, चौधर यांना मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे, उपनिरीक्षक माळी, चौधर, सुळ, शिर्के, राठोड, वाल्मिकी, दहिभाते, शेळके आदींनी ही कारवाई केली.