पुणे – सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक कारवाईसाठी गेले असताना एका बांधकाम व्यावसायिकाचा चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणी गुन्हे शाखा आणि सिंहगड पोलिसांनी एकमेकांकडे बोट दाखवत चुप्पी साधली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाला घाबरुन पळून जात असताना बांधकाम व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू झाला. तर स्थानिक पोलीस स्टेशन आणि परिमंडळाचे उपायुक्तांकडून चौकशी सुरु आहे एवढेच सकाळपासून सांगत आहेत.
ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता वडगाव येथील एका सोसायटीत घडली. संबंधीत व्यावसायिक आणि एक व्यक्ती चौथ्या मजल्यावरुन पाईपच्या सहाय्याने खाली उतरत होते. तेवढ्यात खाली पडून बांधकाम व्यावसायीकाचा मृत्यू झाला.
तेथे गुन्हे शाखेचे पथक आर्म ॲक्टची कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आमचे पथक तेथे कारवाईला गेले होते, त्यावेळी शेजारील इमारतीतून संबंधीत व्यक्ती खाली पडून मृत झाला. आम्ही स्वत:हून सिंहगड पोलिसांना याची कल्पना दिली. यामुळे आमचा संबंधीत घटनेशी संबंध नाही, त्याच्या मृत्यूचे कारण सिंहगड पोलीसच सांगू शकतील असे स्पष्ट केले.