नवी दिल्ली – केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करण्यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर ही मुदत वाढवली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील 48 कोटी पॅन कार्ड धारकांनी आपले कार्ड आधारशी लिंक केले आहे, अशी माहिती सीबीडीटीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, जी पॅन कार्डे आधारशी या मुदतीत लिंक केली जाणार नाहींत ती पॅन कार्डे बाद केली जाणार आहेत. त्यामुळे ज्यांनी अद्याप असे लिंकिंग केलेले नाही ते त्वरीत हे काम करतील असा विश्वास त्यांनी आज पीटीआयशी बोलताना व्यक्त केला.
ते म्हणाले की पॅन कार्ड आधारकार्डाशी जोडण्यासाठी आम्ही अनेक मोहीमा घेतल्या, प्रचार केला, त्यासाठी दिलेली मुदतही अनेक वेळा वाढवली आहे. परंतु आता ठरलेल्या मुदतीतही जे हे काम करणार नाहीत त्यांना कर सवलतींचाही लाभ मिळू शकणार नाही कारण त्यांचे पॅन कार्डच वैध असणार नाही.
केंद्र सरकारने पॅन कार्ड हेच सामान्य नागरीकांसाठीचे ओळखपत्र म्हणून मान्य केल्याने त्याचा उद्योग आणि व्यवसाय क्षेत्राला मोठा उपयोग होणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.