नेवासा – खडका-सलाबतपूर रस्त्यावर दोन वेगवेगळ्या झालेल्या विचित्र अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सलाबतपूर शिवारात हॉटेल वैभवजवळ झालेल्या अपघातात ऍपेरिक्षा पलटी होऊन एक 27 वर्षीय महिला जागीच ठार झाली आहे, तर जळके खुर्द शिवारात दुसऱ्या झालेल्या अपघातात क्रेनच्या धडकेत एका ऐंशी वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात वेगवेगळ्या घटना घडल्यामुळे रविवार आणि सोमवार हा काळा दिवसच ठरला असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, खडका-सलाबतपूर रस्त्यावरील हॉटेल वैभव ढाब्यासमोर रविवारी (दि. 14) रात्री ऍपेरिक्षा पलटी होऊन रेश्मा नानासाहेब पोपळघट (वय 27, रा. आश्वी, ता. संगमनेर) ही महिला जागीच ठार झाली आहे. सोमवारी (दि. 15) दुपारी झालेल्या दुसऱ्या अपघातात क्रेनच्या धडकेत कलाबाई बिरोबा काळे (वय 80, रा. जळका खुर्द, ता. नेवासा) ही वृद्ध महिला क्रेनखाली सापडून जागीच ठार झाली.
दूरध्वनी बंद; सामान्यांची अडचण
पोलीस कर्मचारी नेवासा फाटा येथील अपघाताची माहीती घेण्यासाठी आले असता प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपात्रात पुलावरून एकाने उडी मारल्याची खबर पोलिसांना मिळाली असता पोलीस त्वरित प्रवरासंगमकडे रवाना झाले होते. 24 तासांत सात वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतानाही नेवासा पोलीस ठाण्याचा दूरध्वनीही बंद पडल्यामुळे पोलिसांसह सामान्यांना पोलिसांना खबर देण्यास प्रचंड अडचण निर्माण झाली आहे.