नेवासा – नेवासा फाटा रस्त्यावरील मध्यमेश्वर नगरसमोरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भरधाव येणाऱ्या मालमोटारीने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, आब्बास अब्दुलहमीद शेख (वय 50, रा. आलमगीर, ता. जि. नगर) मोटरसायकल (एमएच 16 बीडी 1866)वरून नेवाशाकडे येत असताना समोरून येणाऱ्या मालमोटारीने (एमएच 17 बीडी 8700) जोराची धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराच्या डोक्याला व कानाला गंभीर मार लागून नाकातून रक्त येऊन जखमी झालेला होता. जखमीला रुग्णवाहिकेतून औषधोपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत बरकत बरकतउल्ला शरीफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात मालमोटारचालक सुधाकर वसंत चव्हाण (वय 35, रा. प्रभाग 7, सरस्वती कॉलनी, ता. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार तुळशीराम गिते करत आहेत.