पुणे – खूनाच्या गुन्हयातील आरोपींची मुंढवा पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. गुन्हेगारांची समाजातील दहशत कमी होण्यासाठी असे करण्यात आले. मुंढव्यात सलग झालेल्या दोन खुनानंतर नागरिकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला होता. तसेच स्थानिक आमदारांनी नागरिकांसोबत बैठकही घेतली होती. यानंतर मुंढवा पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास सुरवात केली आहे.
घर आणि गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्याला हटकल्याने कोयत्याने वार करून व्यावसायिकाचा खून करण्यात आला होता. तसेच रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लूटण्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर कायदा -सुव्यवस्थे संदर्भात नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.
ही बाब लक्षात घेऊन मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांनी पथके नेमूण केशवनगर आणि मुंढवा भागात सकाळ, दुपार, संध्याकाळ पेट्रोलिंग आणि नाकाबंदी संशयास्पद वाटणाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी हद्दीतील ब्लॅकस्पॉटवर देखील पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे.
दरम्यान गन्हेगारांची नागरिकांमधील दहशत कमी होण्यासाठी खूनाच्या गुन्हयातील आरोपींची आज धिंड काढण्यात आली. यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
“खुनाच्या गुन्हयातील आरोपींना बुधवारी घटनास्थळी बेड्या घालून नेण्यात आले होते. ते जेथून आले होते आणि खून केल्यावर जेथपर्यंत गेले होते, तेथे त्यांना नेण्यात आले. मागील काही दिवसांत जवळपास दिडशे गुन्हागारांची झाडाझडती घेण्यात आली आहे.” — अजित लकडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)