राज्य शासनाची एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती
मुंबई : राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे असे राज्य शासनाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनतेला आश्वस्त केले असून टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, गेल्या पाच दिवसात स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेणाऱ्या लाभार्थीपैकी सुमारे 30% धान्य उचलले आहे. उर्वरित धान्य उचलण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेतील मोफत तांदूळवाटप लवकरच सुरु होईल. ‘मोफत वाटपासाठी आलेला तांदूळ पैसे घेऊन विकला जात आहे’, अशा तक्रारी प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत, तथापि मुळात मोफत तांदळाचे वाटपच अजून सुरू झाले नसल्याने या बातम्या तथ्यहीन आहेत. मोफत तांदूळ वाटपासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमधून धान्याची वाहतूक सुरु झाली आहे, अशी माहिती राज्य शासनाने प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.
विशेष महत्त्वाचे म्हणजे किराणा दुकाने ही अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.