– बाजारापासून अडीच किलोमीटर परिसरात करोना रुग्ण सापडला
– पोलीस, कॅन्टोन्मेंट प्रशासनाचा घेतला निर्णय
पुणे (प्रतिनिधी) – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा खडकी येथील उपबाजार पुन्हा बंद करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. बाजाराच्या अडीच किलोमीटर परिसरात करोनाग्रस्त रुग्णआढळून आल्याने पोलीस व कॅन्टोन्मेंट प्रशासनाने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तू असलेला भाजीपाला बाजार सुरळीत व्हावा यासाठी पोलीस, कॅन्टोन्मेंटचे अधिकारी व बाजार समिती यांमध्ये नुकतीच बैठक पार पडली. यावेळी करोनाग्रस्त भागातील नागरिकांना बाजार आवारात प्रवेश न देता बाजार आवार सुरू करण्याच्या सूचना बाजार समितीच्या वतीने करण्यात आल्या. मात्र, पोलीस व कॅन्टोन्मेंट प्रशासन बाजार बंद ठेवण्याच्या भुमिकेवर ठाम आहे. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना कळविण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले
बुधवार (दि. 15) पासून बाजार सुरू झाल्यानंतर खडकी येथील उपबाजारात गुरुवारी 21 वाहनांमधून 300 क्विंटल शेतमालाची आवक झाली होती. दरम्यान, शनिवारी (दि. 18) मोशी उपबाजारात 126 वाहनांमधून चार हजार 100 क्विंटल शेतमालाची आवक झाली. मांजरी उपबाजारात 110 वाहनांतून २ हजार क्विंटल तर उत्तम नगर उपबाजारात 10 गाड्यांमधून 130 क्विंटल शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. पुणे क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या मोशी, मांजरी आणि उत्तम नगर या तीन उपबाजारात मिळून 246 वाहनांमधून 6 हजार 230 क्विंटल शेतमालाची आवक झाल्याचे सांगण्यात आले.