जळगाव – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षांतराचा निर्णय घेतला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादी काॅंग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पत्रकार परिषदेत भाजप सोडण्याचे कारण सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी माझं आयुष्य उध्वस्त केलं. त्यामुळे मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, असा धक्कादायक खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच येत्या शुक्रवारी (23 ऑक्टोबर) मी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, गेली चार वर्षांपासून मी तणावाखाली होतो. देवेंद्र फडणवीस यांनी माझं आयुष्य उध्वस्त केलं. त्यामुळे नाईलाजाने मला भाजप सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीने कोणतेही आश्वासन दिलेले नाही. तसेच माझ्यासोबत एकही आमदार-खासदार पक्षांतर करणार नाही. रक्षा खडसे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, एकनाथ खडसे हे शुक्रवारी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी घोषणा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
“एकनाथ खडसे यांच्यासोबत चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांचा निर्णय ठरलेला असल्यामुळे खडसेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,” अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे.