जळगांव – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उद्या घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र, एकनाथ खडसे यांनी याबाबत खुलासा केला आहे. खडसे म्हणाले, राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला या विषयावर काहीच बोलायचे नाही. नो कमेंट्स, असं उत्तर देत या विषयाचे एकनाथ खडसे यांनी खंडन केले. तसेच ‘माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सारे मुहूर्त तुमचेच आहेत’, असं ते यावेळी म्हणाले.
काही खासगी कामानिमित्त एकनाथ खडसे हे शुक्रावारी दुपारी जळगावला आले होते. त्यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत पत्रकारांनी खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, मला या विषयावर काहीही बोलायचे नाही. माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सर्व मुहूर्त हे तुम्हीच म्हणजे माध्यमांनीच ठरवले आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले.
त्यामुळे सध्यातरी राजकीय वर्तुळात एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला ब्रेक लागला आहे.