वॉशिंग्टन – अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यास आता केवळ पंधरा दिवस बाकी राहिले असतानाही ट्रम्प यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना धमक्यांचे प्रकार सुरूच असल्याचे दिसून आले आहे.
काल त्यांनी जॉर्जिया प्रांताच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला फोन करून माझी मते शोधून काढा नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली आहे. त्यांच्या या फोन कॉलचे रेकॉर्डिंग प्रसार माध्यमांना उपलब्ध झाले असून त्यावरून विरोधकांनी ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
या संबंधात वॉशिंग्टन पोस्टने जे वृत्त दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की जॉर्जिया प्रांताचे सेक्रटरी व मुख्य निवडणूक अधिकारी ब्रॅड राफेनस्पेर्जर यांना ट्रम्प यांनी फोनवरून धमकावले. माझा पराभव विजयात परावर्तीत होईल इतकी माझी तेथील मते शोधून काढा असे ट्रम्प त्यांना धमकावत असल्याचे फोन रेकॉर्डिंग वरून आढळून आले आहे.
ट्रम्प यांनी केलेला हा अधिकाराचा गंभीर दुरपयोग असून या प्रकरणी त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई होऊ शकते असे विधी तज्ज्ञांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी या अधिकाऱ्याला फोनवर असे सांगितले आहे की, या निर्णयामुळे जॉर्जियाचे लोक खूप संतापले आहेत. त्यामुळे देशातील जनताही नाराज आहे. मी जॉर्जियात पराभूत होईल हे संभवतच नाही.
तुम्ही फक्त माझी 11 हजार 780 मते शोधून काढा असे ट्रम्प त्यांना सांगताना दिसून येत आहे. या प्रांतात ट्रम्प हे 11 हजार 779 मतांनी पराभूत झाले आहेत त्याच्यापेक्षा त्यांना तेथे किमान एक जादा मत मिळालेले हवे आहे असे त्यांच्या सांगण्यावरून दिसते आहे. ट्रम्प यांच्या या साऱ्या थयथयाटातून त्यांची सध्या जगभर थट्टा होताना दिसत आहे.